निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच देणार प्रशिक्षण – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
अनुकंपा 71 व एमपीएससीच्या उमेदवार 38 अशा 109 उमेदवारांना नियुक्तीपत्र
हिंगोली प्रतिनिधी अरविंद किर्तने, दि. 04 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या 150 दिवसांच्या उपक्रमात अनेक कार्यक्रम राबवित आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रलंबित असलेला अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदाची नियुक्ती देऊन प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या धोरणाने अत्यंत सुलभपणे शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या सेवेचा योग्य वापर करुन शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करा, असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व नवनियुक्त उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील 71 अनुकंपा व 38 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवार अशा 109 उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्यात आज 5 हजार 187 अनुकंपा उमेदवारांना, तसेच 5 हजार 122 एमपीएससी उमेदवारांना अशा एकूण 10,309 उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या नवघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. अनुकंपा नियुक्तीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रक्रिया सुलभ करुन या नियुक्तीचा मार्ग सुकर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती दिली, ही आनंदाची बाब आहे. घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाले होते. ते दूर करण्याचे काम शासनाने केले आहे. तसेच उर्वरित अनुकंपाधारकांना लवकरच नियुक्ती देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनुकंपा धारकांची नियुक्तीची प्रतीक्षा संपली असून, आता या उमेदवारांनी आपल्या जनतेची सेवा करण्याच्या कामातून नाव कमवावे, असे सांगून आमदार राजुभैय्या नवघरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये आस्थापनाविषयक अनेक मुद्दे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा नियुक्तीसाठी विशेष परिश्रम घेऊन निकाली काढली. हा नियुक्ती सोहळा आज होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. अनुकंपामध्ये गट क व ड मधील 71 तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील 38 उमेदवार असे एकूण 109 उमेदवारांना आज नियुक्ती देण्यात आली आहे. नवनियुक्त उमेदवारांच्या आयुष्यामध्ये हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात होणार आहे. हा सोहळा चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. आपणास मिशन कर्मयोगीमध्येही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लवकरच आपणास अवगत करण्यात येणार आहे, असे सांगून सर्व नवनियुक्त उमेदवारांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले. सूत्रसंचालन व आभार तहसीलदार आश्विनकुमार माने यांनी केले. यावेळी दसरा महोत्सव समितीच्या वतीने 11 लक्ष 11 हजार 01 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे सुपुर्द केला.
या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवार यांच्यासह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply